कचरा कोंडी, रखडलेली विकासकामे...सेना-भाजप तणावाबाबत फडणवीस काय बोलणार?

Foto

औरंगाबाद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (गुरुवार) औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून, फुलंब्री तसेच औरंगाबाद शहरात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होणार आहे. औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक विकासकामे रखडलेली असताना या दौर्‍यात फडणवीस काही ठोस निर्णय जाहीर करणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. भाजप-शिवसेना युतीतील तणाव, राम मंदिर व अन्य मुद‍्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर केलेली घणाघाती टीका या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस काय बोलणार, याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे.

 

शहरातील कचरा कोंडी, अनियमीत पाणीपुरवठा, खराब रस्ते, समांतर जलवाहिनी योजना आदी अनेक प्रश्‍न गेल्या अनेक दिवसांपासून जैसे थे आहेत. मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या कामासाठी महापालिकेला 100 कोटींचा निधी उपलब्ध दिला आहे. या 100 कोटींच्या निधीतून होणारे रस्ते, स्मार्ट सिटीफ योजनेअंतर्गत शहर बससेवा, एस.टी.पी. प्लाँट या कामाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांचा वेळ व श्रेय घेण्यावरून मनपातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांत बरेच राजकारण रंगले. अखेर आज सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टी.व्ही. सेंटर चौकात रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असून, महापालिकेने या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण असावेत, यावरून भाजप-सेना पदाधिकार्‍यांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांत बरेच राजकारण रंगले. 

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये देऊनही महापालिकेला ही कामे सुरू करण्यास बराच विलंब लागला. त्यात विविध कामांसाठी तब्बल 2 हजार 420 कोटी रुपये निधीची मागणी करणारे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य व अन्य पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. शहरातील रस्ते विकासासाठी 150 कोटींचे विशेष अनुदान शासनाने मंजूर केले असून, त्यापैकी शंभर कोटी रुपये प्राप्‍त झाले आहे. उर्वरित 50 कोटींच्या अनुदानासह आणखी शंभर कोटी रुपयांचे अनुदान रस्त्यांच्या कामासाठी देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे. सातारा-देवळाईसाठी 1 हजार कोटी रुपये, तर अमृत योजनेअंतर्गत 1016 कोटी रुपये, क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामासाठी 2 कोटी रुपये, विविध महापुरुषांच्या नावाने उभारण्यात येणार्‍या संशोधन केंद्रांसाठी 15 कोटी रुपये, रस्ता रुंदीकरणात धोकादायक ठरणारे विजेचे खांब व डीपी स्थलांतरित करण्यासाठी 20 कोटी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 50 कोटी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी 10 कोटी रुपयांच्या निधीची मागणी निवेदनात केली आहे.


4 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादसह मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील 32 पैकी 19 निर्णयांची अजूनही पूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केलेल्या कामांपैकी अनेक कामांना सुरुवातच झालेली नाही, तर काही कामे अजूनही अपूर्ण आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेली ही बैठक म्हणजे केवळ देखावा होता का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी 3.15 वा. औरंगाबाद कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जाधववाडीतील बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुलात होणार आहे. सायंकाळी 5 वा. एमजीएम शिक्षण संस्थेच्या रुक्मिणी हॉलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या विजय लक्ष्य 2019 कार्यशाळेस ते उपस्थित राहतील. सायंकाळी 6.15 वा. टी.व्ही. सेंटर चौकात शहरातील रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग करण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमानंतर फडणवीस यांचे विमानाने मुंबईला प्रयाण होईल.

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker